Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्या सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥ म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें । खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे । म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥ हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥ म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या । अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥ एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे । वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे । एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी । म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥ गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें । देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥ म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥ धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥ तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें । तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥ तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी । आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥

Tuka 148

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.